जिल्ह्यातील पाच औद्योगिक वसाहतीमधील जवळपास दीड लाख कामगार, उद्योजक, अधिकारी, कर्मचार्यांची कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अॅन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे. महानगरपालिका हद्दीतील कामगारांची टेस्ट सुरू झाली आहे. बिडकीन, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहती ग्रामीण भागात येत असल्याने तेथील कामगारींची तपासणी करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांजवार्ताला दिली.
जिल्ह्यात पाच औद्योगिक वसाहती आहेत. त्यात जवळपास 3 लाखांवर कामगार कार्यरत आहेत. पण लॉकडाऊनच्या काळात 50 टक्के परराज्यातील कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे उर्वरित दीड लाख कामगारांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील चिकलठाणा एमआयडीसीत 10 हजार व रेल्वे स्टेशन एमआयडीसीत 3 हजार कामगारांची 6 ठिकाणी तपासणी सुरू आहे. शेंद्रा 30, वाळूज 90 हजार व बिडकीन 5 हजार कामगारांची तपासणी जिल्हा परिषदेमार्फत करण्याबाबत संघटना चर्चा करणार असल्याचे अभय हंचनाळ यांनी सांगितले. दरम्यान, मोठे उद्योग स्वतःच आपल्या कामगारांची टेस्ट करणार्या असल्याचेही त्यांनी सांगितले.














